नारायणगावच्या वैभवात पडणार भर, राजा शिवछत्रपती महाद्वाराचे होणार लोकार्पण
नारायणगावच्या वैभवात पडणार भर, राजा शिवछत्रपती महाद्वाराचे होणार लोकार्पण
नारायणगाव | नारायणगाव शहराच्या पूर्व वेशीचा जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळा कार्यक्रम ३ जानेवारी २०२२ ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गावचे सरपंच योगेश पाटे यांनी हि माहिती दिली.
नारायणगावच्या वैभवात भर घालणाऱ्या या वेशीच्या कामाचे लोकार्पण ५ जानेवारी २०२२ रोजी खा. संभाजीराजे छत्रपती, खा.डॉ.अमोल कोल्हे, प्रसिद्ध शिवव्याख्याते आ.नितीन बानगुडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व आ.अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला माजी आमदार शरद सोनवणे, जि.प. सदस्य आशाताई बुचके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हेही उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. ०३ जानेवारी २०२२ रोजी किल्ले शिवनेरीवरील माती आणि पाणी कलश आणण्यात येणार आहे. यादिवशी गावामध्ये मिरवणूक व गाव जेवण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि.०४ जानेवारी रोजी होम हवन करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच पाटे यांनी दिली.
या वेशीच्या नवीन संरचनेमध्ये फायरप्रुफ फायबर चा वापर करण्यात आला आहे. जुन्या बांधकामाच्या रचनेला धोका पोहोचू नये यासाठी फायबर मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने हे काम होत आहे व सदर कामाचा व कार्यक्रमाचा अंदाजे खर्च हा ५० लक्ष रु. आहे असं सरपंच पाटे यांनी सांगितले आहे.
सरपंच पुढे म्हणाले, वेशीच्या या जीर्णोद्धार कामामुळे नारायणगाव च्या वैभवात व गावच्या सौंदर्यात निश्चित भर पडणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही याचा फायदा गावाला होणार आहे.