भास्कर जाधवांनी का मागितली माफी? विधानसभेत भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी
मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल केल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केली. माफी मागावी किंवा भास्कर जाधव यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भास्कर जाधव यांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागितली भास्कर जाधव म्हणाले, “मी बोलत असताना कळत नकळत हातवारे होतात. बोलण्याच्या ओघात पंतप्रधानांविषयी काही अंगविक्षेप केले असतील किंवा नक्कल केली असेल. पण भास्कर जाधवांनी कुठलाही आक्षेपार्ह शब्द वापरला. मी असंवेदनशील शब्द वापरला नाही. मी अंगविक्षेप मागे घेतो म्हटलं पण देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी मी याठिकाणी पंतप्रधानांच्या बाबतीत काही बोलल्याने सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंवेदनशील शब्द वापरला नाही जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तो मी उल्लेख केला तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो.”
एका लक्षवेधी दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन करुन देण्याची आठवण करुन दिली. यानंतर वादाला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
त्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 -50 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देईल असं म्हणाले पण काय झालं? असं म्हणत जाधव यांनी पंतप्रधनांची नक्कल केली. यानंतर भास्कर जाधवांनी माफी मागावी अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. तसेच भास्कर जाधव यांना निलंबित करा अशीही मागणी करण्यात आली.
यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे सभागृहात नाहीत त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही, कारण ते उत्तर द्यायला नसतात. मी चॅलेंज देतो की असं वक्तव्य माननीय पंतप्रधान यांनी केलंच नाही.
देशाच्या पंतप्रधानांबद्दल हे आम्ही सहन करणार नाही. भास्कर जाधव यांना निलंबित करा पंतप्रधान यांची नक्कल कसे करू शकतात. माफी मागा नाहीतर त्या सदस्याला निलंबित करा अशी मागणी फडणवीसांनी केली.
यावर भास्कर जाधव यांनी म्हटलं, 15-15 लाख रुपये देणार असं पंतप्रधान कधी बोलले नाही असं विरोधक म्हणत आहेत. परंतु ते शब्द फिरवत आहेत. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार मी म्हणतोय, की ते पंतप्रधान झाल्यावर मी बोललो नाही तर पंतप्रधान होण्यापूर्वी काय बोलले हे सांगितले याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही तर एका उमेदवाराची नक्कल केली.