परमबीर सिंग यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई! गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती
गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती...
परमबीर सिंग यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई! गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. सिंग यांना हे प्रकरण चांगलेच जड जात आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांचे निलंबन करण्यात आले असून आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली आहे.
आमदार अबू आझमी यांनी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर परमबीरसिंग यांच्या विरोधात अखिल भारतीय पोलीस सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आणखी 28 अधिकार्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलीस महासंचालकांनी केल्याची माहिती वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
परमवीर सिंग यांच्यासह 30 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास योग्यपध्दतीने करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलीस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असे वळसे पाटील यांनी उत्तरात म्हटले आहे.
गृह खात्याने अनियमतता झाल्याबाबतचा अहवाल मागवला आहे. अहवालानुसार परमवीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परमबीरसिंह यांना निलंबित कऱण्यात आले आहे.
दरम्यान, परमबीरसिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर ते 25 नोव्हेंबरला मुंबईत परतले होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य असलेली कारवाई परमबीरसिंह यांच्यावर केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले होते.