नोकरभरती परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवरून सत्यजीत तांबेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर!
गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याच्या काही बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्यातील परीक्षार्थी तरुण तणावाखाली वावरत आहेत.
महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर खासगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. परंतु नुकताच ‘म्हाडा’चा पेपर फुटल्याच्या व मध्यंतरी आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. तसेच आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी काही उमेदवारांच्या केंद्रांची अदलाबदलही झाली होती. त्यामुळे हे सगळे प्रकार अर्थातच कंत्राटदार कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे घडत आहेत असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे .
एका कंपनीला नोकरभरतीचे काम मिळाले की, दुसरी कंपनी त्यात अडथळा आणण्यासाठी काहीतरी कारस्थान करते, दुसऱ्या कंपनीला काम मिळाले की तिसरी कंपनी त्यात काहीतरी आडकाठी आणते असे प्रकार सुरु आहेत. एकंदरीतच सरकारी नोकरभरतीमध्ये असे प्रकार गेल्या दोन अडीच वर्षांपासून सतत सुरू आहेत. यामागे अनेक लोकांचे हितसंबंध असून मोठा भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात काहीजण आहेत. यातून भविष्यात ‘व्यापम’प्रमाणे एखादा मोठा घोटाळा होण्याची शक्यता सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे या सर्व नोकरभरतीचे काम एमपीएससीकडे देण्याची गरज आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील लाखो युवकांना खासगी कंपन्यांच्या आपापसातील स्पर्धा व राजकारणाचा फटका बसणार नाही.
सत्यजीत तांबे यांनी युवकांच्या हिताच्या दृष्टीने विचार करत सरकारला विनंती केली आहे की, चतुर्थ श्रेणीसह सर्व प्रकारची सरकारी नोकरीभरती एमपीएससीमार्फत करावी. तसेच एमपीएससीच्या सक्षमीकरणासाठीही ठोस कार्यक्रम राबवावे. एमपीएससीच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणावी. एमपीएससीला एका भक्कम व दर्जेदार तांत्रिक सहाय्याची गरज असून ‘टीसीएस’सारख्या नावाजलेल्या व विश्वासार्ह कंपन्यांकडे हे काम द्यावे. एमपीएससीसाठी पायाभूत सुविधा उभारणी, कार्यालयाचे सक्षमीकरण करणे व पुरेसे अधिकार द्यावे.
महाविकास आघाडी सरकारकडून युवकांना खूप अपेक्षा आहेत. कारण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तयार केलेल्या युवकांच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा शब्द दिला होता व तो पाळलाही. युवकांच्या मागणीनुसार सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केले. त्यामुळे युवकांच्या मनात या सरकारबद्दल प्रचंड विश्वास असून गेल्या वेळच्या सत्तापरिवर्तनातही त्यांचे महत्वाचे योगदान होते. आज तेच युवक आशेने सरकारकडे बघत असून त्यांच्यासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण यावर तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी विनती सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार सकारात्मक निर्णय घेईलच, मात्र हा निर्णय तातडीने व्हावा, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे.
चतुर्थश्रेणीसह सर्व सरकारी पदांची नोकरभरती #MPSC मार्फत करावी, अशी मागणी उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार व बाळासाहेब थोरात साहेबांना पत्र लिहून केली. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NhSZGF5791
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) December 14, 2021
सदर मागण्या तातडीने मान्य न केल्यास सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस च्या माध्यमातून तीव्र आंदोलनाचा ईशारा ही सरकारला दिला आहे. आता युवक काँग्रेस आंदोलन करेल की सरकार सत्यजीत तांबे यांच्या मागण्या मान्य करेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.