मिस युनिव्हर्सचा किताब 21 वर्षांनी भारताकडे, हरनाज संधू झाली यंदाची मिस युनिव्हर्स

मिस युनिव्हर्सचा किताब 21 वर्षांनी भारताकडे, हरनाज संधू झाली यंदाची मिस युनिव्हर्स

70वी मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा इस्रायलमधील इलात येथे पार पडली. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा मान मिळवला आहे. तिने हा मान मिळवून पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील स्पर्धकांना मागे टाकले आहे. भारतीय बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने 2000 मध्ये हा मान जिंकला होता आणि त्यानंतर 21 वर्षांनी हा मानाचा ‘किताब भारताकडे परत आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये तिला जे काही प्रश्न विचारण्यात आले, त्यापैकी एक प्रश्न म्हणजे “हवामान बदल ही बाब बऱ्याच लोकांना फसवी वाटते, ही गोष्ट त्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय करू शकाल? यावर तिने अतिशय समर्पक असे उत्तर दिले “अनेक समस्यांमधून निसर्ग जात आहे हे सगळे पाहून माझे हृदय नेहमीच हळहळते आणि याला कारण आपल्या सर्वांची बेजबाबदार वर्तणूक आहे. मला वाटते की हीच वेळ आहे न बोलता फक्त कृती करण्याची. कारण आपले प्रत्येक पाऊल आपल्या निसर्गाला एकतर वाचवू शकते किंवा पूर्णपणे नष्ट करून टाकू शकते. जे झालंय त्यावर पश्चात्ताप न करता आपल्या चुकांमधून शिकून त्यामध्ये दुरुस्ती करणे चांगले आहे.” हरनाजच्या या उत्तरावर टाळ्यांचा एकाच गजर उपस्थितांमधून आला.

माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनला शेवटचा विचारला गेलेला प्रश्न होता की “what is the essence of being women?” म्हणजेच “एक स्त्री असल्याचा अर्थ काय आहे?” यावर सुष्मिताने उत्तर दिलं की, ‘एक स्त्री होणं ही देवाची देणगी आहे ज्याची आपण सर्वांनी प्रशंसा केली पाहिजे आणि तिचं कौतुक केलं पाहिजे. मूल एका आईपासून जन्माला येतं. ती ही एक स्त्री असते. बाई एका पुरुषाला शिकवते, काळजी कशी घ्यायची आणि प्रेम कसं करायचं हे सगळं एक स्त्री शिकवते. हे स्त्रीची गुणवत्ता आणि तिची वैशिष्ट्य आहेत असे अतिशय सुंदर समर्पक उत्तर दिले ज्याने ती मिस युनिव्हर्स चा ‘किताब जिंकली.

माजी मिस युनिव्हर्स लारा दत्तालाही तिनं या स्पर्धेत भाग का घेतला? असा प्रश्न अंतिम फेरीत विचारला होता. यावरच्या तिच्या उत्तराने सर्वांनाच चकित केले होते. “मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. माझ्यासाठी ही केवळ सौंदर्य स्पर्धा नाही तर आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी मदत करणारा एक मंच आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणींच्या सौंदर्याच्या मोहात सर्वजण पडतो पण सोबतच त्यांच्या इतर गुणांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मुळात सौंदर्य स्पर्धा हे नावच मला चुकिचं वाटतं. त्या ऐवजी कर्तुत्ववान स्त्रियांची स्पर्धा असं आपण म्हणायला हवं.” या उत्तराने ती ही स्पर्धा जिंकली होती.

हरनाझ संधू आहे तरी कोण?
2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस बॅकसोबत तिने सौंदर्य स्पर्धेला सुरुवात केली. यानंतर ती 2017 मध्येच मिस चंदिगढ स्पर्धा जिंकली होती. 2019 फेमिना मिस इंडिया पंजाब चा किताबही तिने मिळवला. मिस इंडिया 2019 स्पर्धेत ती बेस्ट टॉप 12 फिनालिस्टपर्यंत पोहोचली होती. हरनाझ बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्येही झळकली .
हरनाझ ने मिळवलेला हा बहुमान
भारताला तिसऱ्यांदा मिळाला आहे. मिस युनिव्हर्स चा बहुमान याआधी 1994 मध्ये सुष्मिता सेन, तर 2000 मध्ये लारा दत्ता यांना मिळाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.