गोष्ट अभिमानाची..! टीम इंडियाची आशिया कपसाठी घोषणा; BCCI ची जुन्नरच्या सुपुत्राला सुवर्णसंधी!
गोष्ट अभिमानाची..! टीम इंडियाची आशिया कपसाठी घोषणा; BCCI ची जुन्नरच्या सुपुत्राला सुवर्णसंधी!
संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे २३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी २० सदस्यीय संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधार पदी यश धूळ याची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्युनियर क्रिकेट निवड समितीने आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) स्पर्धेपूर्वी ११ ते १९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे शिबिरासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या २० जणांच्या संघात वसू वत्सचा समावेश झाला आहे. परंतु अजूनही त्याच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह आहे. वेळेत फिट झाला तरच तो स्पर्धा खेळू शकेल. या निवडींमध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेची या संघात निवड झाली आहे. याआधी १९ वर्षांखालील भारत ब संघात कौशलला बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेमध्ये संधी मिळाली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून कौशल ओळखला जातो.
कौशलचे मागील दहा वर्षापासून केंड्स क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण सुरूआहे. कौशल पुण्यामधील एसपी कॉलेजमध्ये प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. याआधी कौशलने पुण्यातील वेगवेगळ्या क्लबमधून क्रिकेट खेळले आहे. २०१६ मध्ये त्याला एमसीएचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवले गेले होते.
१९ वर्षाखालील आशिया चषक संघ: यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्या यादव (उपकर्णधार), राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गरव सांगवान, रवी कुमार, ऋषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स