माझी शिफारस नसल्याने शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाही शशिकांत शिंदेंचा खोचक टोला
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांना खोचक टोला लगावला आहे.
“जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी निवडून आलो असतो तर मी शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांकडे केली असती. मागील वेळी शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष झाले होते मी आणि रामराजे नाईक निंबाळकर आम्ही सगळे होतो. तेव्हाही मीच पवार साहेबांकडे शिफारस केली होती, यावेळी मात्र माझाच पराभव झाल्यामुळे माझ्या सारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला आ. शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावलाय.
शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले तरीही त्यांचं अध्यक्षपद कायम ठेवण्यात आलं होतं. जिल्हा बँकेतील कामकाज हे पक्षविरहित असते. सहकार पॅनेल देखील पक्ष विरहित पॅनेल होते. असं शिंदे म्हणाले.
माझ्या पराभवामुळं जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीची दखल पक्षश्रेष्टींना घ्यावी लागली तसेच शिवेंद्रराजेंना सर्वात जास्त काळ अध्यक्ष पदी संधी मिळाली. त्यामुळं नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
स्वीकृत संचालक होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी पक्षनेतृत्त्वाकडे अशी कोणतीही मागणी केली नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, सातारा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद नितीन पाटील तर उपाध्यक्षपद अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे.