शिवसेना काँग्रेसमधील जवळीक वाढली? संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
सध्या यूपीए कुठे आहे? या ममता बॅनर्जी यांच्या प्रश्नावर मोठा वाद काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मध्ये पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना मात्र काँग्रेसच्या मागे ठाम उभी राहिली. यानिमित्ताने शिवसेना व काँग्रेसमधील जवळीक वाढत असल्याचे समोर येत आहे.
शिवसेनेकडून मात्र या जवळीकीला दुजोरा मिळतोय याचं कारण म्हणजे शिवसेना नेते आणि खा.संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.
मंगळवारी आणि बुधवारी या भेटी होणार आहेत. आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
युपीए आघाडीच्या मुद्यावरून तृणमूल काँग्रेस व इतर काही राजकीय पक्षांकडून काँग्रेसवर टीका सुरू होती मात्र, शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून युपीए आघाडीचे समर्थन करत काँग्रेसची पाठराखण केली होती. त्यानंतर आता शिवसेना नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेश मध्ये प्रचार दौऱ्यावर आहेत. त्या दिल्लीत परतल्यानंतर त्यांच्यासोबत संजय राऊत यांची भेट होणार आहे.
संसदेच्या मागच्या अधिवेशनात राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात भेटी व चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राऊत यांच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबतही वारंवार भेटी होताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आणणार असल्याचे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रतिवाद करण्यासाठी शिवसेनेची मोठी मदत होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.