रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई – खा. अमोल कोल्हे यांचा इशारा

नारायणगाव | पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा. तसेच या रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूर चे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व नारायणगाव, हिवरे, खोडद गावचे ग्रामस्थ यांच्या बैठकीत खा.कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्यावरील खोडद चौकात झालेल्या अपघातात हिवरे येथील कल्पना योगेश भोर(वय ३२) या विवाहितेचा मृत्यू झाला. त्या नंतर संतप्त खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामस्थांनी आंदोलन करून बाह्यवळण रस्त्यावर आंदोलन करत रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.

खा. कोल्हे यांनी ३० नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेत खोडद चौकातील भुयारी मार्गाच्या मंजुरीसाठी तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. या संदर्भात गडकरी यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने निर्देश दिले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.०४) खा. कोल्हे यांनी योगेश भोर यांची भेट घेऊन सांत्वन केले. त्या नंतर त्यांनी बाह्यवळण रस्त्यावरील खोडद चौक येथे पाहणी करून अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्या समावेत बैठक घेतली. या वेळी जि.प.सदस्य पांडुरंग पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, युवा नेते अमित बेनके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमित गोरड, सी डी फकीर, दिलीप शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस ठाण्यात मंदार जवळे, पोलिस निरीक्षक विलास देशपांडे , माजी सरपंच गुलाबराव नेहरकर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, अवधूत खरमाळे, इंद्रजीत गायकवाड, आशीष वाजगे, गणेश वाजगे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. अपघात टाळण्यासाठी खोडद चौकात गतिरोधक व अन्य सुधारणा करून वाहनांचा वेग कमी करणे आवश्यक आहे. या साठी आम्ही दोन वर्षे पाठपुरावा करत आहोत. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी या बैठकीत मांडली. खा.डॉ. कोल्हे म्हणाले खोडद चौकात १५ फूट रुंद व साडेपाच मीटर उंच भुयारी मार्ग करण्यात येईल. मात्र मंजूरी व इतर तांत्रिक बाबींसाठी वेळ लागणार आहे. दरम्यान अपघात टाळण्यासाठी खोडद कडून येणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी योग्य जागा निर्माण करणे. दोन गतिरोधकाच्या मधल्या पट्यात योग्य जाडीचे गतिरोधक व रंबलर बसवण्याची गरज आहे. या संदर्भात आवश्यक त्या सुधारणा येत्या आठ दिवसांत तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा केल्यास व अपघात झाल्यास प्रशासकीय कारवाई करावी लागेल. असा इशारा खा.कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.