विघ्नहरच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ, संचालक मंडळाचा निर्णय
विघ्नहरच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ, संचालक मंडळाचा निर्णय
जुन्नर | जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय गुरुवार (ता.०२)रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. त्रिपक्षिय समितीच्या वेतन करारानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत कारखान्यातील कायम कामगारांमधून एक कार्यलक्षी संचालकाची निवड करण्यात आली. या पदासाठी सर्व कामगार,अधिकारी व संचालक मंडळाने ज्येष्ठ कर्मचारी व मिलफोरमन बाळकृष्ण सखाराम चाळक यांची एकमुखाने शिफारस केली. त्यामुळे चाळक यांची कार्यलक्षी संचालक पदावर एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे चाळक यांना संचालक मंडळात कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.
या बैठकीत त्रिपक्षीय समितीचे करारानुसार विघ्नहरच्या कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. कामगार युनियनच्या बैठकीत राजेश सोपान कुर्हे यांची कामगार युनियनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामात सुमारे १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून २०२१-२२ चा गाळप हंगाम २० ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे. आत्तापर्यंत विघ्नहरने दोन लाख ५१ हजार ७९० मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे.
कामगारांची वेतनवाढ १ नोव्हेंबर २१ च्या पगारापासून देण्यात येणार आहे. वेतनवाढीच्या फरकाची रक्कम कामगारांना टप्प्या-टप्प्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कामगार वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.