काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी अशोक चव्हाणांचा ममता बॅनर्जींवर निशाणा

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शरद पवारांच्यासमो यूपीए कुठे आहे?
असा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या वक्तव्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंट आणि घोड्यासारखी नाही, अशा आशयाचे ट्विट करत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करून ममतादीदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

चव्हाण यांनी ट्विटमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विलासराव कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे. अलिकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असंही चव्हाण यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे.

चव्हाण यांनी काल ममतादीदींना टोला लगावणारी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. लोकशाही व संविधानाप्रती वचनबद्धता आणि केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला कुणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे लढा दिला. केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची सक्रिय आणि आक्रमक भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’ नीतीचा वापर करत आहे. देशभरातील भाजप विरोधी पक्षांनी केंद्राच्या त्या नीतीला बळ देणारं राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने ते चांगलं नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.