बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित…?
बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित…?
राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बेशिस्त आणि अनियमिततेचा ठपका सिंह यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीरसिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर सही केली असून, निलंबनाचा आदेश आजच निघणार आहे अशी माहिती मिळत आहे.
आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.
सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने केली होती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दुजोरा दिला होता. पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य असलेली कारवाई परमबीरसिंह यांच्यावर केली जाईल, असे वळसे पाटील म्हणाले होते. अखेर परमबीरसिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केली आहे अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे.
परमबीरसिंह यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. नंतर ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात देखील त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने हे वॉरंट रद्द करून परमबीरसिंह यांना दिलासा दिला होता. ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासही त्यांना त्यावेळी बजावण्यात आले आहे.