अहंकारी व असंवेदनशील कारभाराची दोन वर्षे – आशिष शेलार
मुंबई | महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारमधील नेत्यांनी कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर विरोधी पक्षाकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी द्विवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार म्हणजे अहंकार असलेलं सरकार आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
शेलार यांनी पत्रकार परिषदेतून आघाडी सरकारच्या कामाचा पंचनामा केला. मी मंत्रालयात येणार नाही, अधिवेशन घेणार नाही. माझ्यापक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले हे सरकार आहे, असं शेलार यांनी म्हंटले आहे.
अहंकारी व असंवेदनशील कारभाराची हि दोन वर्षे राहिली. पेट्रोलवरील कर कमी करण्याऐवजी विदेशी दारुवरील कर कमी केला. वायनरीला सबसिडी दिली. शेतकऱ्यांसंदर्भात बोलायला तयार नाही. वीस वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाचा एका एजन्सीला पैसा दिला गेला. पण एसटीच्या कामगाराला द्यायला पैसे नाहीत. रयत शिक्षण संस्थेला करोडो दिले जातात, आमचा विरोध नाही. पण शाळांना अनुदान दिले जात नाही. शाळा बंद मात्र फी वाढ केली गेली. थेट जनतेतून सरपंच निवडणूक घेण्याचे बंद केले. शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क काढून घेतला. लोकशाहीला मारक असे हे निर्णय का घेतले जातात? असा हल्लाबोल शेलार यांनी केला.