हिवाळी अधिवेशनात ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारणीसाठी सत्यजीत तांबे यांची आक्रमक भूमिका !

एकीकडे राज्यातील महामार्गांचे जाळे विस्तृत होत असून दुसरीकडे महामार्गांवरील अपघातांचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढले आहे. अपघात होऊन जखमी झालेल्यांचा जीव वाचविण्यासाठी वेळीच उपचार होणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरबाबत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. नाशिक, अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर्सची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पायवारी करणाऱ्या वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी जर ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध असते तर वेळीच उपचार झाल्यामुळे या वारकऱ्यांचा जीव वाचला असता, असं आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनातही अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील ट्रॉमा केअर सेंटर सुरु करावे, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. संबंधित खात्याशी याबाबत पत्रव्यवहार देखील झाला होता. परंतु कोणतेही पाऊल याबाबत अद्यापही उचलले गेले नाही, असे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

संबंधित ट्रॉमा केअर सेंटरची माहिती घेतली जाईल व अधिवेशन संपल्यानंतर चर्चासत्राच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेऊन, ट्रॉमा केअर सेंटर सुरु केले जाईल, असे आश्वासन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.