हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार सत्यजीत तांबेंनी उत्तर महाराष्ट्रासाठी उठवला आवाज!

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यातील लोकप्रतिनधी जनतेच्या कोणत्या समस्या सभागृहात मांडणार आणि त्यातून किती प्रश्न मार्गी लागतील यावर सर्वांचे लक्ष लागून असते. सिन्नर येथील ‘इंडियाबुल्स’ कंपनीला सरकारने दिलेल्या २७०० एकर जागेचा पूर्णपणे वापर झालेला नसून उर्वरित जमीन मागे घ्यावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी केली.

पावसाळी अधिवेशनाच्यावेळी देखील आ. तांबेंनी इंडियाबुल्सच्या ताब्यातील १५०० एकर पडीक जमीन परत घ्यावी, अशी सरकारकडे मागणी केली होती. या मागणी नंतर इंडियाबुल्सला नोटीस पाठविण्यात आली होती. परंतु आज हिवाळी अधिवेशनातही इंडियाबुल्सचा मुद्दा त्यांनी पुन्हा मांडला. या कंपनीला दिलेली नोटीस कायद्यानुसार लागू होते का? असा प्रश्न सभागृहात आमदार सत्यजीत तांबेंनी उपस्थित केला.

हा प्रकल्प करत असताना सिन्नरमधील शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन देखील पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भविष्याचे स्वप्न दाखवून त्यांची देखील फसवणूक झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना त्यांच्या जमिनी परत करणार का? आणि केव्हा करणार? असा प्रश्न यावेळी आ. सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. उत्तर महाराष्ट्रातील विकासाला चालना देण्यासाठी नवीन उद्योगनिर्मितीची गरज ओळखून आ. सत्यजीत तांबे यांनी ‘इंडियाबुल्स’ संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सरकार तोडगा केव्हा काढणार? हे बघण्यासारखे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.