सशक्त समाजनिर्मितीसाठी आमदार सत्यजीत तांबे करणार राज्यव्यापी दौरा!

सुदृढ समाज निर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत झाली आहे. युवकांना एकत्र आणून सुदृढ समाज निर्मितीसाठी काम करणे, हे जयहिंद लोकचळवळीचा मुख्य उद्देश असून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे या चळवळीचे संघटक आहेत. जयहिंद लोकचळवळ राज्यभर विस्तार करण्यासाठी ते आता राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

आ. सत्यजीत तांबे या चळवळीच्या विस्तारासाठी नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जाणार असून तेथील जयहिंदच्या जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोणते काम करणे अपेक्षित आहे तसेच नवीन कार्यकर्त्यांचा सहभाग देखील वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

गेल्या २२ वर्षांपासून कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवून जयहिंद लोकचळवळ काम करत आली आहे परंतु आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता संपूर्ण राज्यभर या चळवळीच्या विचारांचा विस्तार होणे महत्वाचे आहे, असे आमदार सत्यजीत तांबेंनी मत व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.