संगमनेर तोडण्याचा डाव, सत्यजीत तांबे थेट बावनकुळेंच्या भेटीला
संगमनेर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत तांबे आग्रही!
संगमनेर, २९ जाने : विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज संगमनेर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यामध्ये संगमनेरच्या अगदी लगतच्या गावांना वेगळे करून त्यांना आश्वी बु. येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाशी जोडण्याचा निर्णय प्रशासन आणि नागरिक दोघांसाठीही गैरसोयीचा आहे. तसेच हा निर्णय प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसते. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला तडा देणारा असा आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील शेकडो नागरिकांना वर्ग २ चे वर्ग १ झालेल्या शेकडो नागरिकांना जमिनीच्या प्रकरणात अनावश्यक नोटिसा आल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी आ. तांबे यांनी महसूलमंत्र्यांना केली.
यावेळी महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या दोन्ही मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य त्या सूचनांचे आदेश देण्याचे आश्वासन दिले असून या विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा संगमनेरकरांना बाळगायला हरकत नाही.