संगमनेरमध्ये बिबट्याच्या पिल्लू आढळल्याने नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
डॉ. मैथिली तांबे यांची घटनास्थळी पाहणी करत मादी बिबट्याचा शोध घेऊन सुरक्षित जेरबंदीचे करण्याचे दिले निर्देश; स्थानिकांच्या सहकार्याचे आवाहन
संगमनेर: शहरातील कुंथुनाथ सोसायटी परिसरात आज दुपारी बिबट्याचे पिल्लू दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोसायटीजवळील झाडीत हे पिल्लू असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त केले.
नगराध्यक्ष डॉ. तांबे यांनी यावेळी बोलताना नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यांनी लहान मुलांना एकटे बाहेर न सोडण्याचे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले. या भागात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसरातील नागरिकांनीही या घटनेमुळे चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना डॉ. मैथिली तांबे यांनी बिबट्याच्या पिल्लासह मादी बिबट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना सुरक्षितरीत्या जेरबंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. यासाठी वन विभागाने पिंजरे लावण्यासह शोधमोहीम सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध असून घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही नगराध्यक्षांनी यावेळी केले.
याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. कुंथुनाथ सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास एका महिलेने प्रथम बिबट्याचे पिल्लू पाहिले आणि आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. यानंतर तातडीने नगरपरिषद प्रशासनाला माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. तांबे यांनी तातडीने दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “नागरिकांची सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. वन विभागाची टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. बिबट्याच्या पिल्लासह मादी बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहावे आणि कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे.” या घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात पाळत ठेवून आहेत. बिबट्याच्या पिल्लासह मादी बिबट्याचा शोध सुरू असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.