श्री चक्रधर स्वामींचे विचार आजही प्रासंगिक -मंत्री भुजबळ
पिंपळवाड-म्हाळसा येथील सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवास छगन भुजबळ यांची उपस्थिती
चाळीसगाव,दि.२४ ऑगस्ट:- श्रीचक्रधर स्वामींनी जात, पात, श्रीमंती-गरिबी, उंच-नीच असा भेद करू नये. सर्व माणसे समान आहेत. कुणालाही दुखावू नये, कुणाचं प्राणघातक नुकसान करू नये. प्रेम, दया, क्षमा या गोष्टींमध्येच खरी शक्ती असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा न करता विचार करावा, प्रश्न विचारावा, सत्याचा शोध घ्यावा. ज्ञानाशिवाय मोक्ष शक्य नाही. साधे जीवन, उच्च विचार हीच खरी साधना आहे ही शिकवण त्यांनी दिली. त्यांनी मांडलेले हे विचार आजही समाजासाठी तितकेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, पिंपळवाड-म्हाळसा, ता.चाळीसगाव येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे १२ व्या शतकातील महान संत, तत्वज्ञानी, समाजसुधारक आणि धर्मप्रवर्तक आहे. ते महानुभाव पंथाचे संस्थापक होते. लोकांना धर्म, भक्ती, समता, करुणा, साधेपणा यांचा मार्ग दाखविण्यासाठी त्यांनी आपला अवतार धारण केला. त्यांच्या जीवनातील घटना पाहिल्या, तर ते नेहमीच समाजातील दुःख पाहून व्यथित होत. त्यांनी आयुष्यभर भटकंती करून जनतेला योग्य मार्ग दाखविला. श्रीचक्रधर स्वामींचे जीवन म्हणजे “साधना, सेवा आणि समर्पण” यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी जातीपातीच्या बंधनांना, कर्मकांडांना विरोध केला. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे म्हणून सर्व जीवांचे रक्षण करणे हेच खरे धर्मकार्य आहे,असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महानुभाव पंथाने सामान्य माणसाला धर्माच्या नावाने होणाऱ्या शोषणातून मुक्त केले. साध्या, सोप्या भाषेत धर्म समजावून सांगितला. म्हणूनच हा पंथ लोकमान्य झाला. आज विज्ञान-तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे. पण समाजात अद्याप अन्याय, विषमता, हिंसा, अंधश्रद्धा आहेत. श्रीचक्रधर स्वामींचा विचार आजच्या काळात अधिकच आवश्यक आहे. त्यांनी दिलेला संदेश समता, दया, करुणा आणि प्रेम हा आपल्याला नवा मार्ग दाखवतो. त्यांचा संदेश केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक सुधारणेसाठीही उपयुक्त आहे. समाजातील ऐक्य, बंधुभाव, सहकार्य यासाठी ते प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, श्रीचक्रधर स्वामींनी स्त्रियांनाही धर्ममार्गावर समान हक्क दिला. त्यांच्या मते स्त्री-पुरुष भेदभाव करणे हे अधर्म आहे. समाजाच्या प्रगतीसाठी स्त्री-पुरुष दोघांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. आजही हा विचार अत्यंत मार्गदर्शक आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृती समाजहितासाठी असली पाहिजे. त्यातूनच खरी भक्ती घडते. श्रीचक्रधर स्वामींच्या शिकवणुकीतून सर्वांना जीवनाचा मार्ग नक्कीच सापडेल. संतांचा विचार हा आपल्या जीवनाचा आधार असावा.श्रीचक्रधर स्वामींच्या शिकवणीप्रमाणे आपण सारे एकमेकांवर प्रेम करूया, दया करूया, सत्याचा स्वीकार करूया आणि भक्तीमार्गावर चालूया असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लिळाचरित्र या ग्रंथाचा संदर्भ घेण्यात आला आहे. रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ निर्माण करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. मराठीचा अधिक सखोल अभ्यास, संशोधन व भाषेच्या संवर्धनासाठी या विद्यापीठाची मोलाची भूमिका असणार आहे. आपण जाळीचा देव आणि महानुभाव पंथाच्या इतर अनेक देवस्थानांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिला. आता महाराष्ट्र शासनाने श्री चक्रधर स्वामींच्या जीवनकार्याशी संबंधित तसेच महानुभाव पंथाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या एकूण ५ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना सुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर,श्री क्षेत्र पांचाळेश्वर, श्री क्षेत्र पोहीचा देव, श्री जाळीचा देव, श्री गोविंद प्रभू देवस्थान, भिष्णूर या देवस्थानचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आचार्य उत्तमराज महाराज, आचार्य येळमकर महाराज, आचार्य जयराज शास्त्री बाबा, आचार्य आरणेकर, आचार्य मानेकर बाबा, आचार्य चोरमांघे शास्त्री, आचार्य हरिराज बाबा, पांढरीकर बाबा, गाजापुरकर बाबा शास्त्री, सुकदेव महाराज, डॉ.कैलास कमोद, डॉ.डी.एन.महाजन, नामदेव माळी, प्रकाश माळी, हरीश महाजन, सरपंच भाऊसाहेब पाटील, अमोल नाईक, अरुण माळी, निंबाजी माळी, सतीश महाजन, अनिल महाजन, यज्ञेश बाविस्कर, विठ्ठल पाटील, हरीश महाजन, आबा महाजन, अनिल पाटील यांच्यासह महानुभाव पंथातील बांधव उपस्थित होते.