विखेंचा घरचा आहेर,श्रीरामपूरची जागा महायुतीच्या अंतर्गत मतभेदाने पडली,
विखेंचा घरचा आहेर,श्रीरामपूरची जागा महायुतीच्या अंतर्गत मतभेदाने पडली,
नगर : विधानसभेच्या घवघवीत यशानंतर भाजपाच्या गोटात उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. कोणतं मंत्रीपद कोणाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी नेत्यांनी मात्र कंबर कसायला सुरूवात केली आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बऱ्याच विषयांबद्दल प्रतिक्रीया दिल्या.
“माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं करत मी चांगलं काम करून दाखवलंय. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर आधी दाखवला गेलाय तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करील अशी मला खात्री आहे”. असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत !
माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. पण ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. उलट पक्षनेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करेन अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. हे सांगतंच, आमची पहिली पसंती हि देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले पाटील ?
मंत्रीपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्रजींनाच आहेत.त्यामुळे वेगळं काही मागण्याचं कारण नाही.पक्षनेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे त्यावरून मला खात्री आहे कि निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ठाकरे गट स्वतंत्र निवडणुक लढवणार का ? असे विचारले असता “पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या पळवाटा आहेत. जनाधार गमावलाय ते कुठं तरी त्यांनी मान्य करायला हवं. उद्धव ठाकेरंनी मोदी आणि शहांवर बेताल विधानं केली. एवढं बेताल विधान करणारा माणूस मी पाहिला नाहीत्याचं शासन त्यांना लोकांनी दिलय.” असं विखे पाटील म्हणाले.