श्रीरामनवमी उत्सवातील संस्कृती हरवत चाललीय? मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची खंत
डिजेच्या गोंगाटात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची शिकवण हरवत असून उत्सवाचे स्वरूप चिंताजनक होत आहे, सनी निम्हण यांचे स्पष्ट मत
पुणे, ०८ एप्रिल – संपूर्ण देशात उत्साहात साजरी झालेली श्रीरामनवमी आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांनी उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.
“मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा उत्सव आपण उत्साहात साजरा करतो ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर त्यांचं जीवनचरित्र, मूल्यं आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचणं हे या उत्सवाचं खरे उद्दिष्ट असायला हवं,” असे नमूद करत निम्हण यांनी तरुण पिढीकडून संस्कृतीचे आणि प्रतीकांचे भान हरवले जात असल्याचे दुःख व्यक्त केले.
“काही भागांमध्ये डीजेच्या तालावर थिल्लर गाणी वाजवून, अश्लीलतेच्या सीमारेषेवर जाऊन साजरे होणारे हे उत्सव महापुरुषांच्या शिकवणीचा अपमान करत आहेत. आपण धर्माच्या आणि परंपरेच्या अभिमानाने उत्सव साजरे जरूर करावेत, पण आपल्या संस्कृतीनं दिलेल्या शिस्तीचं भान राखणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे,” असे सांगत त्यांनी सर्व समाजाला यावर विचार करण्याचे आवाहन केले.
निम्हण यांच्या या वक्तव्याने समाजात सकारात्मक आणि चिंताजनक चर्चा सुरू झाली असून, उत्सवांचे स्वरूप आणि त्यातील बदलांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.