शिवनेरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला नेतृत्व दिलं; डॉ. अमोल कोल्हे यांचा राज्यात झंझावाती प्रचार
पुणे: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लवकरच पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडून महाराष्ट्रातील ४८ जागांवर निवडणूक लढणाऱ्या मतब्बरांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीचा आढावा घेतला असता महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एका नव्या तळपत्या सूर्याचा उदय झाल्याचं स्पष्ट दिसतंय. या सूर्याचं नाव… डॉ. अमोल रामसिंग कोल्हे !
शिरूर लोकसभा मतदारसंघात स्वतः अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक लढवत असूनही डॉ. अमोल कोल्हे यांनी बारामती, माढा, मावळ, नगर दक्षिण, कोल्हापूर, सातारा या महत्वाच्या मतदारसंघांतही महाविकास आघाडीची खिंड जोरदारपणे लढवली. वरील प्रत्येक मतदारसंघातील ३ ते ४ सभा घेऊन डॉ. अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली. यापैकी नगर दक्षिण आणि माढा या मतदारसंघांत तर उमेदवार तयार करण्यापासून डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका निर्णायक राहिली आहे.
१३ मे रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही एका दिवसाचीही उसंत न घेता त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी, नाशिक, धुळे या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. वणी, सटाणा, मालेगाव, देवळा अशा अनेक ठिकाणी सभा गाजवून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचारात मोठी आघाडी मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या मनात असलेली डॉ. अमोल कोल्हे यांची आदरयुक्त प्रतिमा, त्यांच्या सभांना होणारी विराट गर्दी, तडफदार भाषणशैली आणि या भाषणांचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम या बाबी राज्यातील अनेक मतदारसंघात “गेम चेंजर” ठरणार असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
महायुतीचे सर्वच नेते स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसलं. अजित पवार गटाचे नेते संपूर्ण निवडणुकीत कुठेच दिसले नाहीत, स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बारामती मतदारसंघात अडकून पडले तर त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना स्वतःच्या रायगड मतदारसंघात घाम फुटला. एकनाथ शिंदे शेवटपर्यंत स्वतःच्या मुलाला तिकीट मिळवून देणे, नाशिकची जागा मिळवणे आणि नरेंद्र मोदींच्या सभेस उपस्थित राहणे, मोदींचा उमेदवारी अर्ज भरणे या कामांत इतके गुरफटले की आपण मुख्यमंत्री आहोत, आपण प्रचाराचे नेतृत्व केले पाहिजे याचाही त्यांना विसर पडला. देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक म्हणवले जाणारे गिरीष महाजन स्वतः जळगावमध्ये संकटात सापडले, देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण निवडणूक अजित पवारांच्या शत्रूंचे रुसवे फुगवे काढण्यात, स्वतःसाठी उमेदवार शोधण्यात आणि विविध आरोपांना उत्तर देण्यातच गेली.
महाविकास आघाडीच्या बाजूने मात्र डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघातील जनसामान्य नागरिकांच्या प्रेमावर विश्वास राज्यभर प्रचाराचा झंझावात उभा केला. महायुतीची भिस्त नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ अशा परप्रांतीय स्टार प्रचारकांवर असताना महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राच्या मातीतील झुंझार नेतृत्व म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनी मैदान गाजवले ही बाब विरोधकही खासगीत मान्य करताय. अनेक दशकांनंतर महाराष्ट्रात असे प्रभावी नेतृत्व उदयास आले अशी महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे, “शिवनेरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला नेतृत्व दिलं” असंही म्हटलं जात आहे.