शिक्षण, आरोग्य, कृषी आणि महिला सक्षमीकरणावर अर्थसंकल्पात भर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प; लाडकी बहीण योजना, मेट्रो प्रकल्प आणि नदी जोड योजनेसाठी मोठ्या तरतुदी
१० मार्च, मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून, अजित पवार यांनी यावर्षी सलग अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून विक्रम नोंदवला आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद:
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी आणखी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य आणि सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
महिला बचत गटांसाठी उमेद मॉल :
महिला बचत गटांना चालना देण्यासाठी राज्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची मदत मिळेल.
कोकणातल्या नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार :
राज्यातील पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोकणातल्या नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत होईल.
मेट्रो प्रकल्पांचा विस्तार:
पुणे, नागपूर आणि मुंबई येथील मेट्रोचे जाळे वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या शहरांतील वाहतूक समस्येचे निराकरण होण्यास मदत होईल.
महिलांसाठी एआय प्रशिक्षण कार्यक्रम:
राज्यातील 10 हजार महिलांना मायक्रोसॉफ्टकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महिलांना तंत्रज्ञानक्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल.
छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची स्मारके:
आग्र्याला छत्रपती शिवराय महाराज आणि संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचा गौरव करण्यात मदत होईल.
मुद्रांक शुल्कात वाढ:
अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्कात वाढ करण्यात आली असून, ऑनलाइन मुद्रांक भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचेही घोषणा करण्यात आली आहे.
एक तालुका, एक बाजार समिती योजना :
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य दर मिळण्यास मदत होईल.
३ ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात सन्मान दिन
अर्थसंकल्पात ३ ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल,यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचा पुरस्कार होण्यास मदत होईल.
आरोग्यविषयक केलेल्या मोठ्या घोषणा:
1 प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरापासून ५ किमीच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी
विशेष योजना राबवली जाणार आहे.
2 तसेच आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची ओळखपत्रे ठरलेल्या वेळेत वितरित केली जाणार आहेत.
3 महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
4 ठाण्यात २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय, रत्नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय, तसेच रायगड
जिल्ह्यात २०० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारले जाणार आहे.
5 स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी
वर्षपूर्तीनिमित्त आनंदवन येथे दिल्या जाणान्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाणार
आहे.
चारचाकी वाहन करात १ टक्क्याची वाढ:
अर्थसंकल्पात चारचाकी वाहनांच्या करात १ टक्क्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या अर्थसंकल्पाद्वारे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वंकष विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा संकेत दिला आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर भर देऊन राज्याच्या प्रगतीचा नवा मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे.