विणकर बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री भुजबळ
हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग - मंत्री छगन भुजबळ
येवला,दि.७ ऑगस्ट:- हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारच्या वतीने विणकर बांधवांच्यांविकासासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विणकर बांधवांसाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना केली आहे. या विणकर बांधवांना पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील आसरा लॉन्स येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, १९०५ साली “स्वदेशी चळवळीला” सुरुवात झाली होती. ही चळवळ ब्रिटिशांच्या विदेशी वस्त्रांवर बहिष्कार टाकून, स्वदेशी कापड आणि हातमागावरील उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी सुरू झाली होती. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेचे एक महत्त्वाचे रूप म्हणजे आपला हातमाग उद्योग.आजही भारतात लाखो विणकर बांधव पारंपरिक कापड विणण्याचे काम करत आहेत. त्यांचे कौशल्य, त्यांचा मेहनतीचा वारसा आणि कलात्मकता हे सर्व भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत.
महायुती सरकारने विणकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२०२८ अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता देण्यात येत आहे. यामध्ये पुरुष विणकर यांना प्रति पूरूष दहा हजार रुपये तर महिला विनकर यांना प्रति महिला विणकर पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता दिला जात आहे. पारंपारिक विणकरांचे सर्वेक्षण करून त्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडे नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येत असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी जाहीर केले.
देशात शेती खालोखाल जर कुठला प्रमुख व्यवसायात असेल तर त्यात विणकर वस्त्रोद्योगाचा समावेश आहे. प्रामुख्याने येवल्यात मोठ्या प्रमाणात विणकर आहेत. सन २००४ साली येवल्यात पैठणीचे फक्त तीन दुकाने होती. आता सुमारे ४०० हून अधिक दुकाने सुरु आहे. यातून पैठणी विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने नाशिक, साईबाबांच्या रूपाने शिर्डी तर पैठणीचा विकास झालेला येवला हा पर्यटनाचा सुवर्ण त्रिकोण तयार झाला आहे.
वस्रोद्योग हा येवल्यात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या व्यवसायाशी आपला जवळचा संबंध असून विणकरांच्या प्रश्नांची आपल्याला जान आहे. त्यांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नुकतेच “पैठणी कलाकारी क्लस्टर येवला येथे १२ कोटी २३ लाख रुपयांच्या सामाईक सुविधा केंद्रासाठी (कॉमन फॅसिलिटी सेंटर) राज्य शासनाकडून अंतिम मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत याठिकाणी वॉर्पिंग, रेशीम वळवण्याची सुविधा, रेशीम धागा रंगवणे, वाइंडिंग, उत्पादन डिझाइनिंग केंद्र, मूल्यवर्धन केंद्र, उत्पादन चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहेत
हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षात विक्रीत १०८०.६८ कोटी रुपयांवरून वाढ होऊन ती १७२८.२० कोटी एवढी होईल. क्लस्टरच्या उत्पादकतेत ६५% वरून ९०% पर्यंत वाढ होईल. रोजगारात ३७८ वरून ९४९ पर्यंत वाढ होईल. नफ्यात २१६.१४ कोटी वरून ३४५.६४ कोटी पर्यंत वाढ होईल तसेच निर्यातीत ० वरून ८-१० कोटी पर्यंत वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे पैठणी वस्त्र उद्योगाला अधिक चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होईल. तसेच हे CFC सेंटर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांनाही मदत करणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील वस्त्रोद्योगात क्रांती होणार आहे. तसेच चिखलदरा व बारामती रेशीम पार्कच्या धर्तीवर रेशीम पार्क निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी सांगितले
यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, मकरंद सोनवणे, दिलीप खोकले, प्रा.प्रभाकर झळके, प्रवीण पहिलवान, श्रीनिवास सोनी, नंदकुमार नागपुरे, सुभाष पाटोळे, दिलीप केंद्रे, सुहास भांबारे,अविनाश कुक्कर यांच्यासह विणकर बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.