वाढीव शिक्षकांची रद्द केलेली 283 पदं पुन्हा सेवेत, पठ्ठ्याने करून दाखवलंच !
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या 1293 पात्र शिक्षकांचा समावेश करावा, असा प्रस्ताव शासनाकडे मांडला होता. डॉ. सुधीर तांबे यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील याबाबत अनेकदा पाठपुरावा केला होता. राज्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण 283 पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले आहे.
डॉ. सुधीर तांबे, पदवीधर मतदार संघाचे आमदार असताना या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्याच प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनीदेखील या प्रश्नांसाठी वित्त, शिक्षण, उच्च शिक्षण अशा विविध विभागांच्या सचिवांसह बैठका आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. राज्यातील उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवर 283 शिक्षकांची नियुक्ती झाल्यामुळे डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजीत तांबे यांचे प्रयत्न सफल झाले आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्यामुळे समाधान वाटत आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबेंनी व्यक्त केले आहे.
वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आलेल्या 428 पदांपैकी एकूण 283 पदे पुन्हा नियुक्त करायला सरकारने मान्यता दिली आहे. तसंच उरलेल्या वाढीव पदांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही या निर्णयात म्हटलं आहे.