रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, अधिकृत घोषणा बाकी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, आज अधिकृत घोषणेची शक्यता!
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.
गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. महिला अत्याचारांच्या घटनांवरुन विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या टीकेमुळे लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आघाडीतील महिला नेत्याची वर्णी लागणार, अशी चर्चा होती. अखेर काल (बुधवार) रात्री उशिरा चाकणकर यांच्या खांद्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याचं वृत्त आलं. समाज माध्यमांमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.