महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका
मुंबई | राज्य महिला आयोगाचे गेल्या दीड वर्षांपासून अध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार याविषयी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. कारण आक्रमक नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत नाव न घेता रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’. चित्रा वाघ यांनी मार्मिक पद्धतीने विरोधकांवर टीका केली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून महिला आयोगाची जागा रिक्त आहे त्यासंदर्भात अजून कुठलाच निर्णय घेतला जात नसल्यामुळे चित्रा वाघ यांनी कुठे तरी महाविकास आघाडीला लक्ष केल्याचे दिसते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांची निवड झाली आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून माविआ सरकारला सल्ला दिला आहे.