महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका – अजित पवार

गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई | गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी उपनगराध्यक्ष स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार श्री. सुनिल तटकरे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

आजच्या या पक्ष प्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन अजितदादांनी यावेळी केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घेतला. पवार साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांसाठी सहकार्याची भावना ठेवा अशी पवार साहेबांची आम्हाला सूचना असते, असेही अजित पवार म्हणाले.

यापुढे चिपळूण, दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या पक्ष प्रवेशामुळे गुहागर, चिपळूण भागात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली होती. अनेक वर्ष कुणबी समाजाचे नेतृत्व करुनही अनेक नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नव्हते. मात्र पवार साहेबांनी समाजाला आश्वस्त केले, शिवाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचेही खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.