मराठी भाषा गौरव दिनी दिसले साहित्यप्रेमी भुजबळ; मराठी जनतेला दिल्या खास शैलीत शुभेच्छा
कुसुमाग्रजांची कविता सादर करत भुजबळ यांनी अनोख्या पद्धतीने दिल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
२७ फेब्रुवारी / नाशिक :* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे एक राजकारणी आहेत. त्याचबरोबर ते एक कलाप्रेमी, साहित्यप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. आज मराठी भाषा गौरव दिनी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल गौरव व्यक्त करत ते नाशिक जिल्ह्यातील असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या “गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार…” या सुप्रसिद्ध कवितेची काही कडवी देखील वाचून दाखवली. आज दिवसभर त्यांच्या या व्हिडीओचीच चर्चा सुरू आहे.
या व्हिडिओत ते म्हणाले की, “आज २७ फेब्रुवारी, थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन! कुसुमाग्रज नाशिकचेच, शिरवाडे या गावचे. कवितेचं गाव म्हणून शासन या गावात उपक्रम राबविणार आहे. कुसुमाग्रजांनी अनेक चांगली नाटके आणि उत्तमोत्तम कविता देखील लिहिल्या. देशातील साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ देखील त्यांना मिळाला.” अशा शब्दांत त्यांनी कुसुमाग्रजांचा सन्मान केला.
ते पुढे म्हणाले की, “अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांनी अनेक ऐतिहासिक, साहित्यीक व प्राचीन पुरावे संकलीत करण्याचे काम केले. तसेच त्यांच्याबरोबरच दिवंगत प्रा. हरी नरके यांनी देखील यासाठी योगदान दिले.”
गेल्या आठवड्यात दिल्ली येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनातील संमेलाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाचा उल्लेख करत मराठी भाषेचे विविध पदर उलगडून दाखवणारे हे अतिशय उत्कृष्ट भाषण असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सर्वांनी आवर्जून हे भाषण ऐकले पाहिजे, असे आवाहन देखील केले.
यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांची “गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार…” या कवितेचे काही निवडक कडवे देखील वाचून दाखवले. तसेच ही माझी अतिशय आवडती कविता असल्याचे आवर्जून सांगितले. कविता वाचून दाखवल्यावर त्यांनी मराठी भाषेचा अभिमान आपण सर्वांनीच बाळगला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मराठीतील कलाकृती, मराठी वाङ्मय अशा मराठी भाषेचा गौरव वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन देखील केले.