मंत्री भुजबळ यांच्या पुढाकारामुळे पार गोदावरीच्या माध्यमातून १०.५० टीएमसी पाणी उपलब्ध होणार

छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसूर, धामोडे, नगरसुल येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय निवासस्थानाचे लोकार्पण; मांजरपाडाच्या अधिक पाणी मिळण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करणार

गुरुवार, दि. ०७ ऑगस्ट:- मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी दरसवाडी धरणात प्रवाही झालेले आहे. हे पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगावकडे सोडण्यात आले आहे. या माध्यमातून येवला, चांदवड, दिंडोरी तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येतील. आपण केवळ यावरच थांबणार नसून पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त १०.५० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कुसूर, धामोडे, नगरसुल येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी २६३ कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल. यामाध्यमातून १० टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहचविण्यात येणार आहे.

यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, तलाठी आणि मंडल या प्रशासकीय कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीच्या माध्यमातून महसूल विभागाच्या कामांना अधिक गती मिळेल. यामाध्यमातून शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अधिक मदत होईल. तसेच गावातील प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे यामाध्यमातून अधिक कामांना न्याय मिळेल असे त्यांनी सांगितले.

शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल. त्याच बरोबर सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना देखील मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे,गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुमेरसिंग पाकळ,शिवसेनेचे संभाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, एल.जी.कदम,प्रमोद पाटील, मकरंद सोनवणे,सुनील पैठणकर,अल्केश कासलीवाल, सरपंच कांताबाई भड, सरपंच अनिता पैठणकर, उपसरपंच मंगल कमोदकर, माजी सरपंच मंदाकिनी पाटील, सिताराम त्रिभुवन, भाऊसाहेब धनवटे, सतीश पैठणकर, ॲड.मंगेश भगत, दीपक गायकवाड, डॉ.कमलेश पैठणकर, रामदास भड, राजू कांबळे, गणेश गवळी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.