भुजबळ पोहचले रामाच्या दर्शनाला, गोडसेंनी घेतले भुजबळांचेच दर्शन !

भुजबळच नाशिकच्या राजकारणाचे बॉस ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

नाशिक- राजकारणात एकमेकांविरोधात एरवी शड्डू ठोकून उभे असलेले लोक एकमेकांसमोर आल्यानंतर कसे व्यक्त होतात, हा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो. आज नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील असंच काहीसं घडलं. रामनवमीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी शहरातील दोन दिग्गज आले होते. दोघांचाही सामना झाला आणि उपस्थित लोक आता पुढे काय होतं या विचारात असतानाच दोघांमधील एकाने दुसऱ्या ज्येष्ठाला वाकून नमस्कार करत सर्वांना सुखद धक्का दिला. ते ज्येष्ठ नेते म्हणजे खुद्द ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि त्यांना नमस्कार करणारे नेते म्हणजे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे! भुजबळांनी देखील गोडसेंच्या या कृतीला स्मित करून दिलखुलासपणे दाद दिली.

सध्या ज्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायाला मिळत आहे. त्या जागेचे हे दोघेही सध्याच्या घडीचे प्रबळ दावेदार! महायुतीच्या युतीधर्माप्रमाणे ही जागा स्वाभाविकपणे शिवसेना शिंदे गटाच्या पारड्यात जाणार होती. सगळं काही आलबेल वाटत असतानाच महिनाभरापूर्वी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या उमदेवारीसाठी भुजबळांच्या नावाची एंट्री झाली. प्रसारमाध्यमांकडून वेळोवेळी विचारले गेल्यावर महायुतीकडूनही याबाबत कोणताही होकार किंवा नकार स्पष्ट न केला गेल्याने ही बातमी अधिकच बळकट होत गेली. परंतु अद्याप या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही.

त्यातच गोडसेंच्या या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकाच जागेच्या उमेदवारीसाठी दावेदारी असणारे दोन नेते अशा पद्धतीने भेटल्यानंतर लोकांमध्ये वेगवेगळ्या तर्क वितर्क लढवले जात आहेत. उमदेवारी जाहीर झाल्यानंतरच या चर्चांवर पडदा पडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.