भाजपचा दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी
कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी केला पराभव
सिल्वासा | दादरा नगर हवेलीच्या जनतेनं दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला आहे.
दादरा-नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई आत्महत्या केली होती. यावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठ राजकारण रंगलं होतं. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजप नेत्यांवरही आरोप झाले होते. यानतंर शिवसेने भाजपला आव्हान देत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना पोटनिवडणुकीत उतरवलं. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला असून कलाबने डेलकर यांचा 50 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय झाला आहे.
कलाबेन डेलकर ह्या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार असणार आहेत. या निवडणुकीच्या काही दिवस आधीच कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.