‘प्लॉगेथॉन 2021 : मेगा ड्राईव्ह’ 24 ऑक्टोबरला होणार : महापौर मोहोळ
सजग मराठी वेब टीम
पुणे | पुणे शहरात 2019 साली प्लॉगेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर यंदाच्या वर्षी प्लॉगेथोनचे आयोजन करण्यात आले असून रविवारी, 24 ऑक्टोबर रोजी हा मेगा ड्राईव्ह होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या या प्लॉगेथॉनमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
प्लॉगेथॉन 2021 : मेगा ड्राईव्हची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर मोहोळ बोलत होते. या मेगा ड्राईव्हच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी बैठकीचेही आयोजन करण्यात आले असून यात संपूर्ण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
याविषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘प्लॉगथॉनची संकल्पना देशभरात सर्वात आधी पुणे शहरात राबविली होती. ज्यात एक लाखापेक्षा जास्त पुणेकरांनी सहभाग नोंदवत स्वच्छ पुण्यासाठी मोठा हातभार लावला होता. यंदा 98 मुख्य रस्ते आणि 178 उद्यानात आयोजन करण्यात येत असून मनपा आणि खाजगी अशा मिळून 500 शाळा सहभागी होणार आहेत.’ ‘यंदाचा मेगा ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी योग्य त्या सूचना सर्व घटकांना दिल्या असून प्लॉगेथॉनचा उपक्रम राबवताना सुक्ष्म पद्धतीने नियोजन करणे, वॉर्ड स्तरावरही बारकाईने नियोजन करणे, पुणेकरांमध्ये जागरूकता निर्माण करणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे, प्रभावशाली व्यक्तिमत्वांना मोहिमेत सहभागी करुन घेणे आदी विषयावर काम करण्यात येत आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.