प्रशांत मोरे व केशर निर्गुण यांचा महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपदावर डंका

मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन आयोजित कै. विनायक निम्हण स्मृती करंडक आणि ५९वे महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेचे यशस्वी आयोजन!

पुणे, 11 ऑगस्ट 2025 – सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित दुसरा कै. विनायक निम्हण स्मृती करंडक आणि ५९वे महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. पुरुष गटात मुंबईच्या दोन वेळच्या जागतिक विजेत्या प्रशांत मोरे यांनी तर महिला गटात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण हिने शानदार विजय मिळवत राज्य अजिंक्यपद पटकावले.

गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, बाणेर येथे झालेल्या स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत प्रशांत मोरे यांनी मुंबईच्या विकास धारियाचा 24-10, 25-00 असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या जाईद फारुकीने रत्नागिरीच्या रियाज अलीवर 24-11, 23-20 असा विजय मिळवला.

महिला गटात, केशर निर्गुण हिने ठाण्याच्या समृद्धी घडीगावकरवर 22-17, 24-14 असा विजय मिळवला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरचा 00-25, 22-17, 20-15 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले.

अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी या खेळात एकाग्रता व चौकस बुद्धीचे महत्त्व अधोरेखित करताना, स्पर्धांमुळे कॅरमची लोकप्रियता वाढत असल्याचे सांगितले. सोमेश्वर फाउंडेशनचे सनी निम्हण यांनी भविष्यात अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद दिक्षित यांनी कॅरमला प्राप्त झालेल्या व्यावसायिकतेचा गौरव करत, गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचे नमूद केले.

स्पर्धेतील विजेते आणि उपविजेते यांना करंडक व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभास शांताराम जाधव, सनी निम्हण, मिलिंद दिक्षित, एमसीएचे चेअरमन भरत देसलडा, उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार, केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया कुणाल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.