पैशासाठी उपचारास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना
रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? नागरिकांचा मानवतेला काळिमा फासणारी घटनेवर संतप्त प्रश्न
पुणे, ५ एप्रिल : पुण्यातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही.. त्यानंतर वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेल्या तनिषाने जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु तिची तब्येत ढासळल्याने तिला मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले जिथे तिचा मृत्यू झाला.
महात्मा फुले योजनेच्या लाभावर प्रश्नचिन्ह:
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य योजना आहे, ज्याचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी आरोग्य सेवा देणे हा आहे. 2 जुलै 2012 रोजी ही योजना सुरू झालेली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना व्यापक वैद्यकीय सहाय्य देते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित गटांना आवश्यक आरोग्यसेवा कव्हर प्रदान करते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही असं लिहून दिलं आहे. परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेतला आहे. तर सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेच काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून ते आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. या योजनेत, रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या गंभीर आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा दिली जाते.
रुग्णालयाने 27 कोटींचा कर थकवला:
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकतकर थकविल्याचे समोर आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात एकही रुपयाचा कर भरला नसल्याची माहिती पुढे आले आहे. त्यामुळे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकविल्याचे समोर आले आहे. रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने महापालिकेचा गेल्या सहा वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांच कर थकवला आहे. एकीकडे धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे 27 कोटींची थकबाकी दाखविली आहे.
राजकीय हस्तक्षेपास विरोध :
सुशांत भिसे यांनी सांगितले की, भाजप नेते अमित गोरखे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षातील अधिकाऱ्यांनीही हस्तक्षेप केला असताना रुग्णालयाने कोणाचेही ऐकले नाही. “वेळेवर उपचार मिळाले असते तर माझ्या पत्नीचा जीव वाचला असता” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे पुण्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. परशुराम हिंदू सेवा संघासह अनेक संघटना या रुग्णालयाविरोधात निषेध करत आहेत. त्यांची मागणी आहे की या प्रकरणात कडक कारवाई व्हावी आणि गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा.
ही घटना वैद्यकीय सेवेतील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधते. खासगी रुग्णालयांमध्ये पैशाला प्राधान्य दिले जाते का यावर चर्चा सुरू झाली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसारख्या नामांकित संस्थेवरील आरोपांमुळे आता सरकार आणि आरोग्य विभाग यांनी यावर कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता वाढते.