पुण्याच्या समस्येवर पुण्याचे लोकप्रतिनिधी गप्प, पण नाशिक पदवीधरचे आमदार सुसाट!

पुण्यातील नवले पुलावरील अपघातांच्या संख्येत वाढ होतंच आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक लागताच क्षणात ट्रकने पेट घेतला आणि केबिनमध्ये असलेल्या चार जणांचा होरपळुन मृत्यू झाला. या अपघातानंतर सोशल मीडियावर नवले पुलाला चांगलेच ‘ट्रोल’ केले जात आहे.

दरम्यान पुण्याच्या एका रील स्टारने पुलाला ट्रोल करणारा व्हिडीओ बनवून इन्स्टाग्राम वर पोस्ट केला आहे. अत्यंत उपहासात्मक शैलीत पुणेरी शालजोडे या रिलस्टारने प्रशासन व सरकारला लगावले आहेत.

यावर नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी हा ट्रोलचा उपहासात्मक व्हिडीओ स्वतःच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल वरून शेअर करत खंत व्यक्त केली आहे. ‘सोशल मीडियावर आजपर्यंत अनेक गोष्टींची खिल्ली उडवताना, ‘रोस्ट’ करताना पाहिलेलं आहे. पण पुलाला ‘ट्रोल’ केले जातं आहे, हे आज पहिल्यांदा पाहतोय’, अशी खंत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

नवले पुल किती धोकादायक आहे हे या पुलावर होणारे वारंवार अपघात सिद्ध करत आहेत. या पुलाची रचना चुकीची आहे, अशा तक्रारी नागरिकांनी बऱ्याचदा केल्या आहेत. ‘एखाद्या पुलाला जर नागरिक ट्रोल करत असतील तर विकासाची दिशा नक्कीच भरकटली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठोस उपाययोजना करून अपघाताचा आकडा शुन्यावर नेण्यास प्रयत्न करावेत’, अशी मागणी देखील आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. नवले पुलावरील अपघातांबाबत सोशल मीडियावर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया असताना आता आमदार सत्यजीत तांबे यांनी जशी मागणी केली, तसं धारिष्ट्य पुण्याचे लोकप्रतिनिधी दाखवणार का, अशी चर्चा पुण्यात रंगू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.