पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे : केशव उपाध्ये
भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला होता. दरम्यान भाजपनंही प्रत्युत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे.
“पडद्यामागून होणारी वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे. विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडते म्हणून मूळ मुद्दा सोडून दुसरीकडे लक्ष विचलित करण्याची जुनी खोड आहे. ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणं वाजवत फिरायची वेळ शिवसेनेवर आली आहे,” असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.
“अभिमान आहे बाळासाहेबांचा ज्यांनी स्वत: महत्त्वाची पदं नाकारुन इतरांना मोठं केलं. आज त्यांचेच चिरंजीव स्वत: शिवसैनिक आहेत असं सांगत मुख्यमंत्रिपद घेतात. मुलगा शिवसैनिक आहे असं सांगत त्याला पर्यावरण मंत्री बनवतात. बरं मुख्यमंत्रिपदाला घेण्याला भाजपाचा आक्षेप नाही. पण विश्वासघातकी मार्गानं ज्यांना लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांनाच सोबत घेऊन पदं मिळवणं याला मर्दानगी म्हणतात का?,” असा सवालही त्यांनी केला आहे.