निवडणुकीच्या धामधूमितही येवलेकरांच्या समस्यांवर भुजबळांचे बारकाईने लक्ष
येवल्यातील विंचूर चौफुलीची पाहणी, प्रशासनाला सूचना
येवला,दि.२५ एप्रिल : येवला शहरातील विंचूर चौफुली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल बसविण्यासह उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिक आपल्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. शिवाय येवल्याचे शहरीकरण वाढले आहे. यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहरातील विंचूर चौफुली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. नुकताच या ठिकाणी अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध असलेले छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली चौकात भेट दिली व वाहतूक परिस्थितीची पाहणी केली.
राज्यात सगळीकडे उष्णतेबरोबरच निवडणूक रणधुमाळीचाही पारा चढलेला असल्याने सर्व नेते मंडळी प्रचारात व्यग्र आहेत. मंत्री छगन भुजबळ हे राज्यभर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांना उपस्थिती लावत आहेत. परंतु या काळातही आपल्या येवला मतदारसंघातील प्रत्येक घडामोडीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच येवला मतदारसंघातील जनतेचा विश्वास संपादन केलेला दिसून येतो.
विंचूर चौफुली येथे भेट दिल्यानंतर मंत्री भुजबळांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची व वाहुतुक कोंडीची कारणे समजून घेतली. यावेळी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या व सिग्नल बसविण्याच्या सूचना भुजबळांनी केली.