नाशिक, दि. ११ जानेवारी :- नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजितदादा पवार गटाचे आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चेनंतर कोण उमेदवार असेल ते ठरविले जाईल. कुठली जागा कुणाला मिळेल ते लवकरच कळेल पण महायुतीतील कुठल्याही पक्षाला संधी मिळाली. त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे असून त्यादृष्टीने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येणार वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असून सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. पक्षाच काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावे. लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना आपलसं करण्यासाठी प्रयत्न पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावं. काम आपण नेहमीच करतो आता मात्र अतिशय जलद गतीने कामे करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महायुती म्हणून आपण काम करत आहोत. त्यादृष्टीने दि.१४ जानेवारी रोजी मनोमिलन बैठकांचे आयोजन होणार आहे. या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी लवकरात लवकर कार्यकारिणी तयार करून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात. नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाला यश मिळाले आहे. त्यामुळे जनता आपल्या सोबत असून अधिक काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना पक्षाचा निकाल कायद्याच्या कसोटीवर काल लागला आहे. सर्वाधिक लोक ज्यांच्याकडे गेले त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. आपल्या पक्षाच्या प्रकरणात मात्र कुठलाही संभ्रम नाही. आपला पूर्वीचाच व्हीप होता, तोच कायम असल्याने आपली बाजू भक्कम आहे. त्यामुळे अधिक जोमाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा असून या कांद्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.