दिलीप वळसे पाटील सांगतील त्याच उमेदवाराच्या पाठीशी शिरूरची जनता
शिरूर: सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी नंतर होणारी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्ष आपल्या अस्तित्वाच्या लढाईत पूर्ण ताकदीने उतरले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या काळात आपला मतदारसंघ, आपला बालेकिल्ला सांभाळण्यावर नेत्यांचा भर दिसून येत आहे. प्रत्येक मोठा नेता आपली ताकद दाखविण्यासाठी मैदानात उतरला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा काही मोठ्या लढती बघायला मिळतील. बारामती, शिरूर, माढा या मतदारसंघात पवार कुटुंबियांमधील राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये आपल्या राजकीय विरोधकांना आपल्या बाजूला वळविण्यावर अजित पवारांचा भर दिसून येत आहे. तर तिकडे शिरूरमध्ये त्यांनी स्वतःच अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हेंसोबत असलेले राज्याचे विद्यमान सहकारमंत्री आणि आंबेगाव-शिरूरचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेले नेते दिलीप वळसे पाटील यंदा कोल्हेंच्या पाठीशी नसतील. वळसे पाटलांनी जरी भूमिका बदलली असली तरी आंबेगाव-शिरूरचे मतदार मात्र त्यांच्या पाठीशी असून, वळसे पाटील सांगतील त्याच उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे बोलून दाखवत आहेत.
या सर्व घडामोडी आणि राज्यातील राजकीय अस्थिरता या पार्श्वभूमीवर जनता यावेळी मतदान करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीतच शिरूरची निवडणूक चुरशीची होणार, हे मात्र नक्की.