मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी वानखेडेंना केले आहेत.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एका लेडी डॉनच्या हस्तक्षेपावरून एनसीबीला घेरले. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.