तापी खोऱ्याचे वाहून जाणारे ९२ TMC पाणी वळवा; भुजबळांची अजितदादांकडे मागणी!

जळगावात 'राष्ट्रवादी'च्या समृद्ध खान्देश निर्धार मेळाव्यात भुजबळांचे दादांना साकडे

जळगाव,दि.१७ ऑगस्ट :- तापी खोऱ्यातून सुमारे ११० टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाणी आपण अडवू शकलो आहोत. आजही ९२ टीएमसीहून अधिक पाणी हे उकई धरणात वाहून जाते आहे. हे पाणी वळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे. या ९२ टीएमसी पाण्यामुळे हा महाराष्ट्र आणि विशेषतः खान्देश हा सुजलाम सुफलाम होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जळगाव येथे समृद्ध खान्देश निर्धार मेळाव्याच्या प्रसंगी लोकसंघर्ष संघटनेच्या नेत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हजारो कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खान्देश म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर ही एक संस्कृती आहे, ही परंपरेची पाळेमुळे घट्ट रुजलेली माती आहे. इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट, तरुणाईची जिद्द, आणि महिलांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासकथेतील एक सुवर्णपान आहे. खान्देश ही सुपीक माती, समृद्ध परंपरा आणि जिद्दी लोकांची भूमी, तापीच्या पाण्याने न्हालेली, शेतकऱ्यांच्या कष्टांनी फुललेली कापसाची आणि केळीची राजधानी. इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा संगम असलेला हा महाराष्ट्राचा मुकुटमणी,
निर्भयपणा आणि एकतेच्या बळावर प्रगतीकडे वाटचाल करणारा आपला अभिमान खान्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण खान्देश अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, उद्योगपती आणि राजकारणातील लढवय्ये महाराष्ट्राला दिले आहेत. कवयत्री बहिणाबाई चौधरी देखील याच मातीतल्या. त्यांचा २४ ऑगस्ट २०२५ रोजी जन्मदिवस निमित्त त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक आदिवासी बांधवांनी प्रवेश केला. त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठ्या नेत्या मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण महायुती सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. राज्यातील जनेतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याची आपल्या पक्षाची भूमिका आहे. त्यानुसार खान्देश आणि परिसराचा विकास हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा विषय आहे. ती आपल्या पक्षाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या खान्देशात पायाभूत सुविधा, सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग या सर्व क्षेत्रांत इथं अजून बरीच कामं होणं आवश्यक आहे. आपल्याला रोजगारनिर्मिती, शेतीमालाला हमीभाव, जलसंपदा प्रकल्प, आणि उद्योगांना चालना देणारे धोरण हवे आहे. आपण महायुती सरकारच्या वतीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे काम नक्कीच पूर्ण करू असे त्यांनी सांगितले.

मंत्री भुजबळ म्हणाले की, या खान्देश भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पकड अतिशय मजबूत आहे. याआधी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला मोठ यश मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील या खान्देश भागातून आपल्या मोठ यश मिळणार आहे. यामध्ये प्रतिभाताई शिंदे यांचा वाटा अधिक महत्त्वाचा असणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावर त्यांनी गेली पंचवीस वर्ष आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी खर्ची केली आहे. यापुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचे प्रश्न या खान्देश भागाचे प्रश्न मार्गी लावले जातील असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, लोकसंघर्ष पार्टीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी मंत्री अनिल पाटील यांनी केले.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश अण्णा पाटील, आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी शरद पाटील, संजय पवार, सुरेश सोनवणे, शाम सनेर, मनीष जैन, फारुक शहा, किरण शिंदे, उमेश नेमाडे, योगेश देसले, अभिषेक पाटील, विनोद देशमुख, सुनील नेरकर, कल्पना पाटील, मीनल पाटील, सीमा सोनगरे, संगीता पाडवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.