तब्बल सातवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या के. सी. पाडवींचा पराभव; खान्देशात महायुतीचा बोलबाला
लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे उत्साह दुणावलेल्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रासह खान्देशात मोठा झटका बसला आहे. धुळ्यातील पाचही जागा महायुतीने पदरात पाडून घेताना नंदुरबारलाही चारपैकी तीन जागांवर तर एका जागेवर काँग्रेसला खाते उघडता आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले.
सोयाबीन, कापूस, केळी उत्पादकांच्या प्रश्नांना हवा देऊन महाविकास आघाडीने मतदारांना भुलविण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. या निवडणूकीत विद्यमान मंत्री गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांनी आपली जागा कायम राखली तर काही नवख्या उमेदवारांनीही महाविकासला झटका दिला. आमदार एकनाथ खडसे यांची कन्या रोहीणी खडसे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार जागांपैकी तीन जागा महायुतीने तर महाविकास आघाडीने एक जागा काबीज केली आहे.
तसेच तब्बल सात वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री के. सी. पाडवी यांचा तून पराभव झाला आहे. याठिकाणी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा विजय झाला आहे. अपक्ष बंडखोर डॉ. हिना गावित या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहेत.
भाजपचे राजेश पाडवी हे सलग दुसऱ्यांदा विजयी
विधानसभेतील विजयानंतर आमशा पाडवी यांना विधानपरिषदेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शहादा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहे. राजेंद्र गावित आणि त्यांच्यात सरळ लढत मानल्या जात होती. लोकसभेच्या निकाल या मतदारसंघात कॉंग्रेसला 45 हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याने राजेश पाडवींसाठी धोक्याची घंटा मानल्या जात होती. मात्र, मतमोजणीच्या सुरवातीपासूनच राजेश पाडवी यांनी घेतलेली आघाडी काय राहिल्याने त्यांचा 57 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला आहे.
डॉ. गावित सातव्यांदा विजयी
नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून डॉ. विजयकुमार गावित सातव्यांदा विजयी झाले आहे. त्यांनी गेल्या वेळे पेक्षाही अधिकचे मताधिक्य घेतले. या मतदार संघात महायुती मधील शिंदे गटाने थेट त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार किरण तडवी यांचा प्रचार केला होता. डॉ विजयकुमार गावितांच्या एकतर्फी विजयाने त्यांच्या विरोधकांची बत्तीगुल झाली आहे. असे असले तरी मुलगी डॉ हिना आणि नवापूर मधून भाऊ शरद गावित यांचा पराभवाने त्यांच्यासाठी ‘कही खुशी कही गम’ चे वातावरण आहे. नवापूर विधानसभा मतदार संघात शिरीष नाईकांच्या माध्यमातून संपुर्ण खान्देशातून कॉग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी झाला आहे