ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप उपक्रम
पुणे | जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या कात्रज टेकडीवरील वस्त्यांमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप उपक्रम आयोजिक करण्यात आला होता. पुना जेरियट्रीक केअर सेंटर, हेल्पएज इंडिया आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमृत दृष्टी शहरी नेत्र स्वस्थ कार्यक्रमांतर्गत एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या फिरत्या दवाखान्यात या तपासण्या
करण्यात आल्या. कात्रज टेकडीवरील आगम जैन मंदिर परिसरातील श्री गणेश पार्क, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द,
सहयोग वृद्धाश्रम, राधाकृष्ण पार्क आदि वस्तीतील दोनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
तपासणी नंतर ३० ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या
ऑपरेशन्सची गरज आहे त्यांना एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात सवलतीच्या दराने शस्त्रक्रीयेची माहितीही देण्यात आली.
यावेळी एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे समन्वयक दिनेश राऊळ आणि नेत्रचिकित्सक उपस्थित होते. हेल्पेज इंडियाचे
व्यवस्थापक राजीव कुलकर्णी आणि पुना जेरियट्रीक केअर सेंटरचे संचालक डॉक्टर संतोष कनशेट्टे यांनी उपक्रमाचे
समन्वयन केले.