छगन भुजबळांच्या पाठपुराव्यातून येवला पैठणी उद्योगाला मिळणार कॉमन फॅसिलिटी सेंटर
पैठणी उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी उद्योग विभागाकडून १२ कोटी २३ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी
येवला, दि. १७ जुलै :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास (MSICDP) योजनेंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यासाठी १२ कोटी २३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सेंटरमुळे येवल्यातील पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथे पैठणी क्लस्टर साकारण्यात आले आहे. या पैठणी क्लस्टरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यासाठी त्यांचा सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिवांसमवेत त्यांनी या केंद्राची पाहणी करत बैठक घेतली होती. यावेळी या केंद्राला अधिक निधी मंजूर करून सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून या योजनेला १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय अॅपेक्स समितीच्या २० व्या बैठकीत याला मंजुरी मिळाली होती. यानुसार एकूण १२२३.३६ लाख रुपयांचा प्रकल्प खर्च असून त्यामध्ये ९७८.६८ लाख रुपये अनुदान राज्य सरकारकडून, तर उर्वरित रक्कम खासगी सहभाग आणि बँक कर्जाच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक करणार असून देखरेख आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी उद्योग सहसंचालक नाशिक विभाग जबाबदार असणार आहेत. सामाईक सुविधा केंद्राचे (CFC) चे रोजचे संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन पैठणी कलाकारी असोसिएशन, येवला ही विशेष हेतू वाहन Special Purpose Vehicle करणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत याठिकाणी वॉर्पिंग, रेशीम वळवण्याची सुविधा, रेशीम धागा रंगवणे, वाइंडिंग, उत्पादन डिझाइनिंग केंद्र, मूल्यवर्धन केंद्र, उत्पादन चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षात विक्रीत १०८०.६८ कोटी रुपयांवरून वाढ होऊन ती १७२८.२० कोटी एवढी होईल. क्लस्टरच्या उत्पादकतेत ६५% वरून ९०% पर्यंत वाढ होईल. रोजगारात ३७८ वरून ९४९ पर्यंत वाढ होईल. नफ्यात २१६.१४ कोटी वरून ३४५.६४ कोटी पर्यंत वाढ होईल तसेच निर्यातीत ० वरून ८-१० कोटी पर्यंत वाढ होणार आहे.
या प्रकल्पामुळे पैठणी वस्त्र उद्योगाला अधिक चालना मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होईल. तसेच हे CFC सेंटर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांनाही मदत करणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील वस्त्रोद्योगात क्रांती होणार आहे.