गोदावरी स्वच्छता, रस्ते-पुलासह कुंभमेळ्याची कामे नियोजित वेळेत करण्याची पंकज भुजबळ यांची मागणी

कुंभमेळ्यासाठी १००० कोटी तरतुदीचे स्वागत, पण पारदर्शकता व दीर्घकालीन योजना आवश्यक -आमदार पंकज भुजबळ

मुंबई, १० जुलै : विधान परिषदेच्या सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार पंकज भुजबळ यांनी २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यांनी यावेळी गोदावरी नदीची स्वच्छता, रस्ते-पुलांची दुरुस्ती, रामकुंडाच्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन, तसेच भाविकांच्या सुविधा व सुरक्षिततेसाठी व्यापक योजना राबविण्याची गरज असल्याचे सांगितले .

रामकुंडातील काँक्रीटीकरण काढून नैसर्गिक जलस्रोत पुनर्संचयित करा:
आमदार भुजबळ यांनी विशेषतः रामकुंड परिसरातील काँक्रीटीकरणावर टीका करताना म्हटले की, “या ठिकाणी जिवंत पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत, पण त्यावर अनावश्यक काँक्रीटीकरण केल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडखळत आहे. यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे आणि कुंभमेळ्याच्या वेळी भाविकांना शुद्ध पाणी मिळण्यास अडचण येऊ शकते.” त्यामुळे या काँक्रीटीकरणाची तातडीने काढणी करून, गोदावरी नदी व रामकुंडाच्या नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली.

कुंभमेळ्यासाठी १००० कोटीची तरतूद, पण पारदर्शकता हवी:
राज्य सरकारने कुंभमेळ्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली असली तरी, आमदार भुजबळ यांनी या निधीच्या वापरावर पारदर्शकता आणि योग्य नियोजनाची आवश्यकता भर दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, त्यासाठी रस्ते, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि पर्यावरण या सर्व बाबींचे समग्र नियोजन आवश्यक आहे. या निधीचा वापर दीर्घकालीन उपयुक्ततेसाठी व्हावा, केवळ तात्पुरत्या डोळ्यादाखव निर्माण करण्यासाठी नव्हे.

आमदार भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी खालील मुद्द्यांवर भर दिला:
१. रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था – नाशिकमधील रस्ते दुरुस्त करून भाविकांच्या वाहतूकीसाठी सुगम मार्ग उपलब्ध करून देणे.
२. गोदावरी नदीची स्वच्छता – नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे.
३. आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा – पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन्सचा वापर आणि आपत्कालीन सेवा सुनिश्चित करणे.
४. आरोग्य सुविधा – तात्पुरती रुग्णालये, मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांची चमू उपलब्ध करून देणे.
५. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना – नाशिकमधील छोटे व्यापारी, कलाकार आणि स्वयंसेवी संस्थांना या मेळ्यात सहभागी करून घेणे.

कुंभमेळा हा नाशिकचा गौरव, त्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी एकत्र यावे:
आमदार पंकज भुजबळ यांनी म्हटले की, “सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकचा गौरव आहे. या मेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. केवळ सरकारच नव्हे, तर स्थानिक लोकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.

२०२७ च्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहराची तयारी केवळ धार्मिक दृष्टीने नव्हे, तर पर्यटन, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या सर्व बाबींचा विचार करून पूर्ण केली पाहिजे. आमदार पंकज भुजबळ यांनी यासाठी केलेल्या मागण्या ह्या एक जागरूक नागरिक आणि प्रतिनिधी म्हणूनच्या बांधिलकीचे प्रतीक आहेत. राज्य सरकारने या सूचनांचा गंभीरपणे विचार करून कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी एक व्यापक आणि पारदर्शक योजना राबविली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.