गडचिरोलीमध्ये दारूनिर्मितीच्या कारखान्याचे भूमिपूजन, विधानपरिषदेत सत्यजीत तांबे आक्रमक
नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी शनिवार आल्यामळे कामकाज बंद होते. दोन दिवसांच्या या सुट्टीचा सदुपयोग करत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेला भेट दिली दिली. या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून दारूनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन झाल्याची माहिती मिळाली होती. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू कारखान्याला परवानगी कशी मिळते? अशी नाराजी डॉ. अभय बंग यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आ. सत्यजीत तांबेंनी दारू निर्मितीच्या कारखान्याचा मुद्दा सोमवारी अधिवेशनात उपस्थित केला. दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या गडचिरोलीत मद्यनिर्मितीचा कारखान्याच्या उभारणीमुळे, दारूबंदीच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे मत त्यांनी सभागृहात मांडले.
आदिवासी जिल्हा असल्यामुळे काही चालीरीतीनुसार घरगुती वापरासाठी मोहफुलांचा वापर करून दारूनिर्मितीसाठी कायद्यानुसार परवानगी दिलेली होती. परंतु व्यावसायिक स्वरूपात जर अशा पद्धतीने कारखाना उभा राहत असेल तर हे खरोखर विचार करण्यासारखे आहे. आ. सत्यजीत तांबे यांनी मांडलेल्या या मुद्द्याने सभागृहात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. गडचिरोलीमध्ये अशा प्रकारच्या मद्यनिर्मितीऐवजी पर्याय म्हणून इथेनॉलनिर्मिती करता येईल का, याची तपासणी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर उत्तर देतांना सांगितले. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी ‘X’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.