कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन
पुणे, 31 जुलै 2025: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम अशा राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, योनेक्स सनराइज सोमेश्वर करंडक 2025 राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून 424 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा द लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी पाषाण या ठिकाणी 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. तर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 9, 11, 13, 15, 19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी या गटात पार पडणार आहे.
याशिवाय माजी आमदार कै. विनायक निम्हण मेमोरियल एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय, पाषाण या ठिकाणी होणार आहे. हि बुद्धिबळ स्पर्धा 8, 10, 12 व 15 वर्षाखालील गटात पार पडणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य संयोजक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लावला होता. यावर्षी ही स्पर्धा 8 ते 10ऑगस्ट 2025 या कालावधीत गोविंद गार्डन मंगल कार्यालय, पाषाण या ठिकाणी रंगणार आहे.
यावेळी स्पर्धेविषयी सांगताना ते म्हणाले, माजी आमदार विनायक निम्हण यांनी त्यांच्या जीवनकाळात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त सलग तिसऱ्या वर्षी विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे ही यावेळी सनी निम्हण यांनी आवर्जून नमूद केले.