के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार

के. के. वाघ शिक्षण संस्थेकडून शिक्षणासोबतच देशातील जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्वाचे कार्य : मंत्री छगन भुजबळ

*नाशिक,दि.२१ ऑगस्ट :- महात्मा फुले यांनी देशात बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली केली. पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यासह अनेक समाज धुरिनिनी शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले. यामध्ये समाजातील सर्व घटकांना शिक्षण देणारी के. के.वाघ ही संस्था आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे यासाठी या शैक्षणिक संस्थाचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे के.के.वाघ संस्था केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

सन १९७० साली पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी नाशिक हे वाढतं औद्योगिक केंद्र होतं. पण शिक्षण, विशेषतः व्यावसायिक शिक्षणाच्या संधी अपुऱ्या होत्या. काकासाहेबांनी समाजातील गरज ओळखून मुला-मुलींना रोजगाराभिमुख, तांत्रिक व कृषिक्षेत्राशी निगडीत शिक्षण देण्याचा विडा उचलला. आज ५५ वर्षांनंतर आपण पाहतो आहोत की ती छोटीशी रोपटं आज वटवृक्ष बनलं आहे.आज संस्थेअंतर्गत २६ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, शाळा, प्रकल्प यातून २७,००० विद्यार्थी घडत आहेत. सुमारे १,८०० शिक्षक-कर्मचारी कार्यरत आहेत. हे आकडे फक्त संख्या नाहीत तर समाजासाठी घडवलेल्या भविष्याचे द्योतक आहेत. के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘A’ ग्रेड, ‘Platinum Category’, NAAC, AICTE-CII, NBA असे अनेक दर्जे मिळाले आहेत. दिल्ली, बंगळूरु, पुणे या शिक्षणकेंद्रांमध्ये नाशिकच्या वाघ संस्थेने मिळवलेला हा सन्मान अतिशय महत्वाचा असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले

कंप्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी अशा सर्व अभियांत्रिकी शाखा जागतिक दर्जाच्या आहेत. आज देशातील अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांतून आपल्या विद्यार्थ्यांना थेट कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकऱ्या मिळत आहेत. फक्त नोकरी नाही तर संशोधन, उद्योजकता, स्टार्टअप्स या क्षेत्रातही आपल्या विद्यार्थ्यांनी लौकिक मिळवला आहे. त्यामुळेच नाशिकचे विद्यार्थी मुंबई-पुण्यापलीकडे स्पर्धा करीत जागतिक दर्जा सिद्ध करू शकले. या शैक्षणिक संस्था महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील आभूषणे आहेत.

नाशिक हे द्राक्ष नगरी म्हणून जगभर ओळखले जाते. पण त्या मागे शेतकऱ्यांची मेहनत जितकी आहे, तितकीच या संस्थेची साथ आहे. संस्थेच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे हजारो शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जलसंधारण, स्मार्ट शेती, कृषी व्यवस्थापन याची माहिती मिळाली. आज ‘नंदनवन’ प्रकल्प, ‘नंदनवन मानांकन’ योजना, द्राक्ष संशोधन प्रयोग, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा उपक्रमांनी के. के. वाघ यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

‘एकविसाव्या शतकातील गुणगौरव’, ‘युवक महोत्सव’, ‘विद्यार्थी संसद’, क्रीडा स्पर्धा, सामाजिक सेवा शिबिरे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडले.आज इंडस्ट्रियल टायअप्स,कॅम्पस इंटरव्ह्यू, ट्रेनिंग & प्लेसमेंट सेल यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळत आहेत.२०२४-२५ मध्येच जवळपास ९५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे नाशिकच्या तरुणाईला पुणे-मुंबईला स्थलांतर करावे लागत नाही, हे एक मोठे समाधान आहे. ही शिक्षण संस्था फक्त ज्ञान देत नाहीत तर जबाबदार नागरिक घडवतात

आयटी क्रांतीत आपण एक पाऊल पुढे होतो. तसेच आता एआय क्रांतीतही आपल्याला एक पाऊल पुढे जावे लागणार आहे . इंटरनेट, डॉट कॉमच्या लाटेनंतर आता कृत्रिम बुद्धिमत्ता एआय, क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टरची त्सुनामी आली आहे. या तीन गोष्टींमुळे संपूर्ण जग बदलणार आहे. ‘तेलाच्या किमतीपेक्षा माहितीच्या साठ्याची किंमत मोठी झाली. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नैतिकता देखील शिकविणे आवश्यक असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, के.के.वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त समीर वाघ, अजिंक्य वाघ, चांगदेवराव होळकर, नानासाहेब महाले, डी. के.जगताप, वामन खोसकर, डॉ. के.एन.नांदुरकर, भास्करराव जाधव, विलास टर्ले, विलास बोरस्ते, आर.डी.जाधव, धनंजय होळकर, सुरेश शेटे, दत्तात्रय डुकरे, रामदास वाढवणे, अनिल चव्हाण, संस्थेचे सेक्रेटरी प्रा.के.एस.बंदी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य के.एन.नांदुरकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रा. व्हि. व्हि.कर्डिले यांनी मान्यवरांचा परिचय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.