केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या येवल्याच्या प्रियंका मोहिते यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान
येवला,दि.२५ एप्रिल : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येवल्याच्या प्रियांका सुरेश मोहिते हिने देशात ५९५ वा क्रमांक मिळवला आहे.य येवल्याचा देशभरात मान वाढवल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील कार्यालयात तिचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत येवला तालुक्यातील प्रियांका सुरेश मोहिते हिने नेत्रदीपक यश मिळवत देशात ५९५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये १ हजार १४३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर नुकताच युपीएससीने वेबसाईटवर निकाल जाहीर केला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी लाखो विद्यार्थी आपल्या जीवाचे रान करत असतात. त्यात मोजक्याच लोकांना यश संपादन करता येते. येवला तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रियंका सुरेश मोहिते हिने आपल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर अभ्यास करत हे मोठे यश मिळवले आहे. यासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.